-संतोष पवार
पळसदेव : पवित्र प्रणालीमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांचे प्रशिक्षण (दि. 4 ते 10 नोव्हेंबर) या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. मात्र, ऐन दिवाळीच्या सुट्टीत प्रशिक्षण होत असल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, हा कालावधी बदलण्याची मागणी करण्यात येत आहे.
शिक्षण विभागाने पवित्र प्रणालीच्या माध्यमातून राबवलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये राज्यभरात सुमारे 17 हजारांहून अधिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील तरतुदीनुसार नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित करण्यात आला आहे. त्यात पहिली ते आठवी, नववी ते बारावीला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी समान असलेल्या घटकांबाबतचे प्रशिक्षण एकत्रित घेतले जाणार आहे. तर, सातवा दिवस स्वतंत्र घटकांसाठी असणार आहे. हे प्रशिक्षण प्रत्यक्ष पद्धतीने (ऑफलाइन) होणार आहे. तसेच राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील नवनियुक्त शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 100 टक्के नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची असणार आहे.