पुणे : दिवाळीत घर, वाहने खरेदीकडे अनेकांचा कल असतो. घर, सदनिका किंवा मोकळ्या जागा खरेदी करण्यासाठी नागरिक दसरा किंवा दिवाळीचे मुहूर्त साधत असतात. यानुसार यंदाच्या दसरा आणि दिवाळीत पुणेकरांनी हा मुहूर्त साधण्याचा चांगला प्रयत्न केला. त्यातूनच यंदाच्या दसरा-दिवाळीत शहरातून मिळणाऱ्या मुद्रांक शुल्कातून मोठा महसूल जमा झाल्याचे राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक शुल्क कार्यालयातून सांगण्यात आले.
पुणे शहरातून आर्थिक वर्ष सुरु झाल्यापासून पहिल्या सहा महिन्यात (सप्टेंबरअखेरपर्यंत) मुद्रांक शुल्कातून एकूण २ हजार ९३२ कोटी ७० लाख रुपयांचा निधी जमा झाला होता. जमा महसुलाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ४९.८८ टक्के इतके होते. मुद्रांक शुल्काच्या जमा रकमेच्या सप्टेंबरच्या तुलनेत फक्त दिवाळीत १०.५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे
पुणे शहरातील मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारातून यंदाच्या दिवाळीत ५६८ कोटी ८९ लाख रुपयांचा महसूल हा मुद्रांक शुल्कातून राज्य सरकारला मिळाला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत आक्टोबरमध्ये मुद्रांक शुल्कातून मिळणाऱ्या रकमेत २० कोटी ८६ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षातील शहरातील निश्चित उदिष्टापैकी ६०.४२ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
पुणे शहरातील मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारातून चालू आर्थिक वर्षात एकूण ५ हजार ८८० कोटी रुपयांचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.