पुणे : पिंपरी – चोली येथे अनर्थ होता होता टळला आहे. स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे 70 शाळकरी मुलांचा जीव बचावला. चालकाचे स्कूलबसवरील नियंत्रण सुटल्याने स्कूलबस इंद्रायणी नदीवरील कठडा तोडून पुढे गेल्याची धक्कादायक घटना, गुरुवारी (दि. 4) दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास आळंदी मरकळ रोडवरील दाभाडे सरकार चौकात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची स्कूल बस आळंदी-मरकळ रोडने विद्यार्थी घेऊन जात होती. चहोली येथील दाभाडे सरकार चौकाजवळ इंद्रायणी नदीवर बस आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल आणि स्कूल बसने नदीवरील पुलाच्या कठड्याला धडक दिली. कठडा तोडून बस अर्धी पुलाच्या बाहेर गेली. यावेळी बसमध्ये 70 विद्यार्थी होते. तुषार दाभाडे, सुशील निगडे, सागर दाभाडे, सुरज दाभाडे, ओंकार भुजबळ, विष्णू तापकीर, संकेत तापकीर, सुनील गावडे यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत स्कूलबसच्या काचा फोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढले. या अपघातामुळे मार्गावर वाहतूक कोंडी झाली. माजी महापौर नितीन काळजी यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्कूलबस क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढली.
दरम्यान, सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली असून इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. काळ आला होता पण वेळ नाही अशी चर्चा परिसरात सुरू आहे.