Dhangar reservation : राजु देवडे/ लोणी धामणी ( पुणे ) : बारामती येथील धनगर समाजाचे लढवय्या नेते चंद्रकांत वाघमोडे यांनी सुरू केलेल्या धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अमंलबजावणी व्हावी यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व महाराष्ट्रातील सकल धनगर समाजाला अनुसूचित जमाती ( एसटी) आरक्षण मिळावे यासाठी आंबेगाव तालुक्यातील पारगाव ( कारखाना) येथे अष्टविनायक महामार्गावर धनगर समाजाने चक्का जाम आंदोलन केले.
आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, येळकोट येळकोट जय मल्हार, कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणांनी महामार्ग दुमदुमून गेला.तसेच महामार्गावर धनगरी गज नृत्य सादर केले. गेले कित्येक वर्षापासून राज्यातील धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे आरक्षणाची वेळोवेळी मागणी करण्यात आलेली आहे. त्यासाठी अनेकदा आंदोलने मोर्चे उपोषण करून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
देशात इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला एस टी चे आरक्षण देण्यात आलेले आहे. फक्त महाराष्ट्रात धनगर आणि धनगड या शब्द प्रयोगामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. धनगर आणि धनगड ही एकच जात असून धनगड जमातीची जात असल्याचे अद्याप पुरावा महाराष्ट्रात मिळालेला नाही. प्रत्येक वेळी राज्य सरकारने फक्त आश्वासने दिली असून धनगर आरक्षणासाठी कोणतीच अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या आंदोलनात धनगर बांधव, महिला, युवक, युवती, शालेय विद्यार्थी, मेंढ्यांचा कळप हा रास्ता रोको मध्ये सहभागी झाले होते. यावेळी माजी पं.स.सदस्य डॉक्टर राजेश पाटील, भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक रमेश लबडे, पै जयवंतराव कवितके,बबनराव पोकळे, वैशाली पोहकर, सुनील चांगण,डी.डी.भोजणे, आदी मान्यवरांची भाषणे झाली. सदर आंदोलनाचे निवेदन पारगाव ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी के.डी.भोजने यांनी स्वीकारले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ जारकड ,पोपट लोले, सचिन लबडे यांनी केले तर आभार गणेश पंडीत यांनी मानले राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.