बीड : बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी न्यायासाठी मोठा लढा दिला आहे. आता त्यांनी दिलेल्या जबाबामधून धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. आरोपी विष्णू चाटे आणि वाल्मीक कराडला भावाला सोडण्याची 20 हून अधिकवेळा विनंती केली. इतकी विनवणी करूनही आरोपींनी ऐकले नाही असा जबाब धनंजय देशमुख यांनी दिला आहे.
धनंजय देशमुख यांनी आपल्या जबाबामध्ये अपहरणाच्या दिवशी घडलेल्या घटना क्रमवार पद्धतीने सांगितल्या आहेत. ते म्हणाले, आरोपी विष्णू चाटे आणि वाल्मीक कराडला भावाला सोडून देण्याची विनंती वीसहुन अधिक वेळा कॉल करून केली.आरोपी विष्णू चाटे यांनी वारंवार सांगितले की, दहा मिनिटात सोडतो, वीस मिनिटात सोडतो.. अर्ध्या तासात सोडतो. पण त्यांनी संतोष देशमुख यांना सोडलं नाही. त्यांची क्रूर हत्या करण्यात आली असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.
आरोपी विष्णू चाटे याने संतोष देशमुख यांना खंडणीच्या आड येऊ नकोस, नाहीतर जीवे मारू, अशी धमकी याआधीच दिली होती. यावर धनंजय यांनी सांगितले की, त्यांनी या धमकीनंतरही केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवली होती. मात्र, त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडत गेली. शेवटी भावाची निघृण हत्या करण्यात आली, असे धनंजय देशमुख हे आपल्या जबाबामध्ये म्हणाले आहेत.