केडगाव / गणेश सुळ : पुणे : पुणे ते दौंड मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रश्नाकडे रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुणे-दौंड मार्गाचा उपनगरीय रेल्वे मार्गात समावेश करावा, अशी मागणी रेल्वे बोर्ड व राज्य शासनाला पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुपकडून करण्यात आली आहे.
पुणे-दौंड मार्गावर इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (ईएमयू) दोन रेक दिले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. पण, अद्याप तरी या मार्गावर हे दोन रेक मिळालेले नाहीत. पुणे-दौंड मार्गावर सध्या डेमू चालवली जाते. पण, तिला सतत बाजूला उभे केल्यामुळे गाडीला उशीर होत आहे. त्यामुळे या मार्गाला उपनगरीय रेल्वे मार्गाचा दर्जा देण्याची मागणी पुणे जिल्हा ग्रामीण रेल्वे प्रवासी संघाकडून करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या प्रमुख मागण्या
– पुणे-दौंड मार्गावर डेमू-मेमू ऐवजी ईएमयू लोकल सेवा सुरू करा
– महिला, सामान, दिव्यांग, फर्स्ट क्लास इत्यादींसाठी स्वतंत्र डबे द्या.
– 01522 ही गाडीचा थांबा हडपसरपर्यंत आहे, ती पुणे स्टेशनपर्यंत करावा.
– पुणे उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये पुणे-दौंड मार्गाचा समावेश करावा.
– 2016 साली विद्युतीकरण झाले. तब्बल 8 वर्ष उलटून गेली लवकरात लवकर इलेक्ट्रिक लोकल सेवा सुरू करावी
प्रवासी समस्या
– पुणे विद्येचे माहेरघर, इंडस्ट्रिअल विभाग असल्याने उरुळी, यवत, खुटबाव, केडगाव, कडेठाण, पाटस, दौंड येथील हजारो विद्यार्थी, कामगार वर्ग, गरोदर महिला, दिव्यांग यांना अतोनात हाल सहन करावे लागतात.
– डेमू-मेमू 10 डब्यांची असल्याने तसेच डिझेलचा खर्च, डिझेल भरण्यासाठी प्रत्येक वेळी 30 मिनिट वेळ, डिझेलमुळे कमी गती यामुळे प्रवासाचा वेळ जास्तीचा होत आहे.
– डब्यांची सख्या कमी आहे. त्यामुळे आसन क्षमता फक्त 90 त्यामुळे बसण्यावरून दररोज वादाला जावे लागते सामोरे.
इलेक्ट्रिक लोकलचे फायदे
– विजेवर धावणारे ईएमयू रेक वापरल्यामुळे डिझेलची आवश्यकता नाही. गती देखील जास्त मिळेल.
– 12 किंवा 16 डब्यामुळे जास्त प्रवासी वाहतूक, आसन क्षमता 110 व जलद प्रवास होईल.
– गरोदर महिला, दिव्यांग, कामगार, विद्यार्थी याचा नाहक त्रास थांबेल.
आरपीएफ बोलावून बाहेर काढले जाते
”आम्ही दररोज पुणे-दौंड सेक्शन दरम्यान प्रवास करतो. परंतु, कोणतीही तत्पर कारवाई आणि दैनंदिन प्रवाशांना चांगली वागणूक मिळत नाही. प्रवाशांच्या समस्यांबाबत रेल्वे प्रशासन व्यवस्थित उत्तरे देत नाहीत. पुणे-दौंड मार्गाच्या समस्या व मागण्यांबाबत रेल्वे बोर्ड व राज्य शासनाला ई-मेलद्वारे निवेदन देण्यात आले आहे. अद्याप याची टोलवाटोलवी केली जात आहे. विचारणा करण्यासाठी गेलो असता आरपीएफ बोलावून बाहेर काढले जाते”.
– प्रमोद शेलार, प्रवासी, खूटबाव.