लहू चव्हाण
पाचगणी : ज्येष्ठांच्या सवलत कार्डची मुदत वाढविण्याबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्हा विभागीय अधिकाऱ्याला पाचगणी येथील ‘जिव्हाळा’ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की ज्येष्ठ नागरिक संघाचे जवळपास शंभर सभासदांनी परिवहन मंडळाचे सवलत पास काढलेला आहे. त्याची आता मुदत वाढवून घेणे आवश्यक असून पांचगणी बसस्थानकात ही सोय उपलब्ध नाही.
सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आम्ही महाबळेश्वर तालुका आगारप्रमुख यांना पत्र देऊन सवलतीच्या पासाची मुदत वाढविण्याची सोय पांचगणी येथे करण्याची विनंती केली होती.परंतु आगारप्रमुखांकडून कसलीही दखल घेतली नसून संबंधित अधिकाऱ्यांने उत्तर देणेची तसदीही घेतली नाही.
याबाबत 13 जुलै रोजी फोन करून विचारले असता “लोकांना महाबळेश्वर येथे पाठवा” असे उत्तर दिले.या पावसाचे दिवसात थंडी वाऱ्यातून लोकांना पाठविणे गैर सोयीचे आहे. शिवाय गेल्यानंतर नेट प्रॉब्लेम, सर्वर डाउन अशी कारणे पुढे येतात. मग अशावेळी ज्येष्ठाना त्रास सहन करावा लागत असल्याने परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जेष्ठ नागरिकांच्या सवलतीच्या पासाची मुदत पाचगणी बसस्थानकातच वाढवून देण्याची सोय करावी अशी मागणी करण्यात आली आहे.