Deepak Kesarkar : सिंधुदुर्ग : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तब्बल 12 वर्षानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली आहे. एकेकाळी टोकाचे राजकीय विरोधक असलेले दोन्ही नेते एकत्र आल्याने जिल्ह्यात चर्चांना मात्र उधाण आलं आहे. राणेंच्या कणकवली निवासस्थानी एक तास चर्चा झाली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीएड बेरोजगार युवकांच्या प्रश्नासोबत इतरही विषयांवर चर्चा झाली. दोन्ही नेते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात एकमेकांचे राजकीय वैरी आहेत. राणेंच्या कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर भेटले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. मात्र आपण घेतलेली भेट ही जिल्ह्याच्या विकासासाठी असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
दीपक केसरकर काय म्हणाले?
राणेसाहेबांची भेट नेहमीच जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भातच असते. लवकरच आम्ही एकत्र बसून नवीन काय करायचे जिल्ह्यांमध्ये याच्याबद्दल चर्चा करू. काही डीएड बेरोजगार हे राणेसाहेबांना भेटायला आले होते म्हणून त्यांनी मला फोन केला. म्हणून मी मुद्दाम इथे आलो. त्यांच्या काही वेगळ्या समस्या आहेत. एकदा डीएड झाल्यानंतर त्यांना टीईटी देता आलेली नाहीये आणि त्याच्यामुळे या संदर्भात रत्नागिरीमध्ये जसं तात्पुरत्या स्वरूपामध्ये तासिका तत्वावर काही लोक काम करतात, तसेच तासिका तत्त्वावर काम करायची तयारी आहे का त्यांची त्याच्याबद्दल विचारणा केली. आम्ही नवीन ज्युनिअर सीनियर केजी सुरू करतोय. त्याच्यामध्ये असा प्रस्ताव करता येईल का त्याच्या संदर्भात मी डिपार्टमेंटशी बोलून तो अर्थ खात्याकजे तो प्रस्ताव पाठवू. नंतर राणेसाहेबांनी म्हटले की आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांना भेटू की जेणेकरून जे डीएड बेरोजगार आहेत. त्यांना नोकरी मिळू शकेल.
वैयक्तिक संघर्ष नव्हता
राणे आणि केसरकर हा संघर्ष वैचारिक संघर्ष होता. शारीरिक संघर्ष नव्हता असं केंद्रीय मंत्री नारायण राणे सांगितलं. आमचे एकमेकाशी चांगले संबंध आहेत. मतभेद वगैरे नाहीत. तुम्ही दाखवा आमच्यात कधी मतभेद होते. त्यांनी सांगावं कधी आले भेटले नाहीत असं कधी झालं नाही. शेवटी विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. डीएडचा कायमस्वरुपी परमनंट जॉबचं व्हावं, जो निर्णय रत्नागिरीला झाला तो इथेही व्हावा, असं नारायण राणे म्हणाले.
केसरकर-राणे वादाची पार्श्वभूमी
बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतील बडे नेते म्हणून दीपक केसरकर आणि नारायण राणे होते. केसरकर आणि राणे हे एकाच जिल्ह्यातील दोन नेते, मात्र दोघांमध्ये टोकाचा संघर्ष. शिवसेनेत असताना दीपक केसरकर यांनी राजकीय दहशतवाद असं म्हणत कायमच राणे यांना लक्ष केलं होतं. गेल्या वर्षीही ज्यावेळी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यानंतर, अन्य नेत्यांचे वाद मिटले होते, मात्र राणे-केसरकर वाद उफाळून आला होता. राणे केसरकराच्यां पारंपारिक वादात निलेश राणे यांनीही उडी घेत, केसरकरांवर टोकाची टीका केली होती.