अरुण भोई
Daund News : समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोलंकी यांची खातेनिहाय चौकशी करून निलंबन करण्यात यावे. तसेच त्यांच्या मालमत्तेचीही गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी राज्याचे समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.(Daund News)
मालमत्तेची गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करावी.
समाज कल्याण सचिव सुमित भांगे यांची खातेनिहाय चौकशी करून व मालमत्तेची गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मेलद्वारे केली आहे. समाज कल्याण विभाग तसेच बार्टी पुणे येथील कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या अनेक वर्तमानपत्र व न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होत आहेत. तेथील भ्रष्टाचार प्रकरणाचे वृत्त येणे नित्याचे झाले आहे. तसेच एका वृत्तपत्रात अनुसूचित जातीचा १४,१९८ कोटी रुपये निधी अखर्चित राहिल्याची बातमी छापली आहे.(Daund News)
तसेच समाज कल्याणचे सचिव सुमित भांगे यांची ५०० कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता असल्याचे वृत्तही आले होते. दौंड तालुक्यातील लिंगाळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी अभ्यासिका सुरू करण्यास तांत्रिक मान्यता द्यावी. याबाबतचा प्रस्ताव पुणे जिल्हा परिषदेने प्रादेशिक उपायुक्त (समाजकल्याण विभाग) सोलंकी यांच्याकडे २६ जून रोजी पाठवला होता. मात्र, या प्रस्तावावर सोलंकी यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही व प्रस्ताव प्रलंबित ठेवला आहे.(Daund News)
यामुळे हे अधिकारी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हिताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असे दिसून येत आहे. हे समानतेच्या न्यायतत्वाला धरून नाही. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून तसेच गुप्तचर यंत्रणेमार्फत यांच्या मालमत्तेची चौकशी करून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवदेनात करण्यात आली आहे.(Daund News)