गणेश सुळ
Daund News केडगाव : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खत देणार होते. परंतु, तसे झाले नाही. खते बांधावर येण्याऐवजी दुकानातही येत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात खतांच्या टंचाईचे चित्र दिसत असून, शेतकरी अडचणीत आला आहे. (Daund News) आधी पावसाअभावी पाणी नसल्याने ऊसाची लागवड, बाजरी पेरणी अशी पिके उशिरा करावी लागल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट आले होते. आता पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या खतांची टंचाई होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. (Daund News)
दौंड तालुक्यात युरिया खताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात युरियाच्या एका गोणीसाठी जीव धोक्यात घालून शेतकरी प्रचंड गर्दी करताना दिसत आहेत. दौंड तालुक्यात युरिया खताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असून, खत विक्री करणाऱ्या दुकानांमधून युरिया गायब झाला असल्याचे चित्र दिसत आहे.
ज्या ठिकाणी युरिया उपलब्ध आहे तेथे शेतकऱ्यांची गर्दी उसळत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी युरिया मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे. त्यासोबतच खत विक्रेत्यांकडून युरिया पाहिजे असेल तर इतर खतेही घ्यावी लागतील, अशी सक्ती शेतकऱ्यांवर करण्यात येत आहे. तरीही सध्या मात्र युरिया खतच मिळत नसल्याची स्थिती आहे. युरिया खतांचा कमी पुरवठा होत असल्याने शेतकरी खत घेण्यासाठी गर्दी करत आहेत.
सध्या पिकाची वाढ होण्यासाठी युरिया खताची गरज असल्याने शेतकरी खत कुठे मिळेल, याची शोधाशोध करत फिरत आहेत. मात्र, शेतकऱ्याला वेळेवर खत उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे.
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना युरिया सोबतच इतर खतेदेखील घेण्याची सक्ती केली जात आहे. त्यात आधीच शेतकरी अस्मानी संकटाने मेटाकुटीला आलेला असताना खत टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुका कृषी विभागाशी संपर्क साधला असता येत्या एक-दोन दिवसात खताचा रॅक लागणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मुबलक प्रमाणावर खत केव्हा उपलब्ध होईल, अशा चिंतेत शेतकरी राजा सापडला आहे.