दौंड, (पुणे) : पाटस-बारामती श्री. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील वासुंदे (ता. दौंड) हद्दीत भरधाव चारचाकी दुभाजकाजकावर आदळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. चालकाचा ताबा सुटल्याने मोटार दुभाजक व नंतर पुलाच्या कठडयाला धडकुन सोमवारी (ता. 30) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अक्षय बाळासाहेब चव्हाण (रा. चिंचणी, ता. शिरुर, जि. पुणे, व प्रिती विशाल भोसले (रा. पाटस, ता. दौंड) असे अपघातात मयत झालेल्या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरून अक्षय चव्हाण व पाटस येथील प्रिती भोसले हे दोघे सोमवारी चारचाकी स्विप्ट मोटारीतून बारामतीला निघाले होते. वासुंदे गावच्या हद्दीत येताच अक्षय चालवत असलेल्या चारचाकीवरील ताबा सुटला. यावेळी मोटार रस्त्याच्या दुभाजकाला व नंतर पुलाच्या कठडयाला धडकली. या अपघातात चारचाकीचे मोठे नुकसान झाले.
दरम्यान, या अपघातात चालक अक्षय व प्रिती गंभीर जखमी झाले. अपघाताचा आवाज ऐकताच परीसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. चारचाकीतून दोघांना तात्काळ बाहेर काढून पुढील उपचारासाठी बारामती येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.