सुरज देवकाते
बारामती – हळदी समारंभामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गाणी लावली म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील तालुका पुसद तेथील सरपंचने व त्यांच्या सहकाऱ्यांनी दलित कुटुंबातील (होलार समाजातील) लोकांना जातिवाचक शिवीगाळ करून कुटुंबांना काठीने बेदम मारहाण केली आहे.
दरम्यान याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहे. संबंधित जातीवाद्यांना तात्काळ अटक करुन कडक शिक्षा करावी या संदर्भातचे निवेदन बारामती शहर व तालुका होलार समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी बारामती, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच बारामती शहर पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहे.
दलित मागासवर्गीय समाजातील होलार समाजाच्या प्रकाश ताळीकुटे यांच्या घरी रविवारी ( ता. २४) जुलै रोजी त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम होता.सदर कार्यक्रमात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे लावली होती. बाबासाहेबांचे गाणी येथे लावायची नाहीत ते गाणे बंद करा असे म्हणत त्या गावचे सरपंच रमेश राठोड यांनी आपल्या जातीयवादी गावगुंडांना गोळा करून टाळीकुटे कुटुंबीयांना जातीयवादी शिवीगाळ करून लाकडाच्या दांडक्यानी बेदम मारहाण केले आहे.
घरातील महिला व मुलींचे कपडे फाडून जबर मारहाण केलेली आहे. यामध्ये अनेक लोक व महिला जबर जखमी झालेल्या आहेत. त्यांच्यावर वरिष्ठ जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार चालू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
याप्रकरणी त्या गावचे सरपंच रमेश राठोड व त्यांचे गावगुंड साथीदारांवर पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रोसिटी अॅक्ट सह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हा दाखल असतानासुद्धा अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. स्थानिक पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी आरोपींना पाठीशी घालत आहेत व हे प्रकरण दादागिरीने मिटवण्याच्या प्रयत्नात आहेत.
या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी तसेच आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी बारामती शहर, तालुका होलार समाजाच्यावतीने उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती तसेच बारामती शहर पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले आहे. आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांना कठोरातली कठोर शिक्षा करावी अन्यथा तमाम होलार समाज महाराष्ट्रभर तीव्र व उग्र स्वरूपात आंदोलन करेल असा इशारा होलार समाजाच्या वतीने देण्यात आला.
यावेळी होलार समाजाचे ज्येष्ठ नेते बाळासो देवकाते, बळवंत माने, बाळासाहेब जाधव, भारत देवकाते, सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती गोरे, गोरख पारसे, सेवक अहिवळे, अक्षय माने,रोहीदास गोरे, लखन कोटगर, पत्रकार सुरज देवकाते या सह होलार समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.