शिरूर : महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने नवीन सांस्कृतिक धोरण ठरवून कलावंतांची समिती तयार करण्यात आली आहे. राज्यात लोकनाट्य तमाशाला राजाश्रय मिळावा, त्यातून तमाशा कलावंतांच्या समस्या मार्गी लागाव्या, समितीच्या वतीने लोकनाट्य तमाशाबाबतचे धोरण ठरविण्यात यावे, यासाठी नारायणगाव (ता. जुन्नर) येथे अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी (ता. 24) बैठक पार पडली.
आण्णा भाऊ साठे सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती पदक विजेत्या स्वर्गीय विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचे स्मारक करणे, विठाबाई नारायणगावकर लोककला विकास महामंडळाकडून तमाशा आणि संगितबारी यातील फरक समजावून देणे, लोककलावंतास चित्रपटाप्रमाणे प्रत्येक वर्षी अनुदान मंजूर करणे, तमाशा कलावंतास प्रत्येक महिन्यास पाच हजार रूपयांचे मानधन मिळणे यांसारख्या प्रमुख मागण्यांचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. हे सर्व ठराव समितीने महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडे पाठविले आहे.
यावेळी विठाबाई नारायणगावकर लोकनाट्य तमाशा मंडळाचे संचालक मोहित नारायणगावकर, रोहित नारायणगावकर, नितीनकुमार बनसोडे, अनिल कुमार बनसोडे, वंसत नांदवळकर, वंसत वाडेकर, फडमालाक नंदू तांबे, बशीरभाई बेल्हेकर, योगेश भिका सांगवीकर, शाहिर विलास अटक, रेखा पाटील कोल्हापूर, नुत्यांगना मिरा दळवी, यासह राज्यातील 99 फडमालक व निर्माते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कराड पंढरीचे अध्यक्ष सुनिल वाडेकर यांनी केले. नितीन बनसोडे यांनी आभार मानले.
राज्याच्या महिला आयोगाने महिला कलाकारांना संरक्षण द्यावे
ग्रामीण भागात लोकनाट्य तमाशा हा यात्रा जत्रांमधील खास आकर्षण असतो. त्यातून कनात, तंबूच्या माध्यमातून उभा केलेली लोकनाट्याची कला रंगमंचावर सादर करण्याची कसरत नृत्यांगनांना अर्थातच महिलांना करावी लागते. यातून महिलांची चेष्टा व त्रास देण्याचे प्रकार घडवून येतात. त्यासाठी राज्याच्या महिला आयोगाने या महिला कलाकारांना संरक्षण देऊन कला सादर करण्यासाठी पोलिस बंदोबस्त द्यावा.
– मोहित नारायणगावकर, संचालक विठाबाई भाऊ मांग लोकनाट्य तमाशा
ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनात वाढ व्हावी
महाराष्ट्र राज्यात लोकनाट्य तमाशाला एक आगळी वेगळी संस्कृती आहे. ही कला लोप पावत चालली असून, त्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाने या कलेसाठी कलाकारांना योग्य मानधन दिले पाहिजे. या कलाकारांना पुरस्कारांच्या माध्यमातून प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. ज्येष्ठ कलाकारांना मिळणारे मानधन हे तुटपुंजे असून, त्यामध्ये वाढ होणे गरजेचे आहे.
– नंदकुमार तांबे,
ढोलकी सम्राट व लोकनाट्य तमाशा फडमालाक
स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांचे स्मारक करावे
लोकनाट्य तमाशा कलेची पंढरी म्हणून नारायणगावची ओळख आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक कलाकरांची जन्मभुमी म्हणून त्यांच्या कलेकडे पाहिले जाते. त्यामुळे राज्याच्या सांस्कृतीक विभागाने राष्ट्रपती पारितोषीक प्राप्त स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांचे स्मारक लवकरात लवकर करावी. तमाशा कलावंताच्या समस्या सोडविण्याचे काम करावे.
– शाहिर विलास अटक
कलाकारांसाठी धोरण तयार करावे
कोरोना काळात लोकनाट्य तमाशा कलावंताची झालेली उपासमार पाहता. राज्याच्या सांस्कृतिक धोरणात तमाशा कलावंताबाबत योग्य धोरण ठरविण्यात यावे. तुटपुंज्या मानधनावर हा कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून प्रबोधन करत असतो. या कलाकारांना व कलेला राज्याच्या घडामोडीत सास्कृंतीक वारसा आहे. त्यातून स्वांतत्रपुर्व काळापासून चळवळीच्या माध्यमातून आपल्या कलेतून देशाला स्वातंत्र मिळवून दिले आहे. ही लोककला लोप पावू नये यासाठी उत्तम धोरण या कलाकारांसाठी तयार करण्यात यावे.
– मिरा दळवी, नृत्यांगना