इंदापूर, ता. 23 : न्यायालयाच्या आदेशानुसार मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी गेलेल्या कोर्ट कमिशनर व अधिकाऱ्यांना ताबा देण्यास नकार देत सरकारी कारवाईत अडथळा आणल्याचा धक्कादायक प्रकार बाभुळगाव (ता. इंदापूर) येथे घडला. याप्रकरणी गणेश भिमराव भोसले (रा. बाभुळगाव) आणि धनाजी ऊर्फ दादा किरकद (रा. पिटकेश्वर) यांच्याविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अकलूज येथील वकील तथा कोर्ट कमिशनर स्वप्नील शिवानंद कोरे (वय 42) यांनी पोलिसांत जबाब दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार बाभुळगाव येथील ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 968, क्षेत्रफळ सुमारे 3,200 चौरस फूट व त्यावरील बांधकामाचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी त्यांची कोर्ट कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

न्यायालयाच्या आदेशानुसार 22 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता श्रीराम फायनान्सचे अधिकृत अधिकारी, कोर्ट कमिशनर तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी असा ताफा संबंधित मालमत्तेवर ताबा घेण्यासाठी पोहोचला. त्यावेळी गणेश भोसले आणि धनाजी ऊर्फ दादा किरकद तेथे उपस्थित होते.

कोर्टाचा आदेश वाचून दाखवून मालमत्तेचा ताबा देण्याची विनंती करण्यात आली. मात्र, दोघांनीही ताबा देण्यास स्पष्ट नकार देत कारवाईला विरोध केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. धनाजी ऊर्फ दादा किरकद यांनी “आम्ही असा कुठलाही कोर्टाचा आदेश पाळत नाही”, असे सांगत कारवाईला विरोध केला. तसेच आपल्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याचे सांगून आणखी एक गुन्हा दाखल झाला तरी फरक पडत नसल्याचे म्हटल्याचा आरोप आहे.
दरम्यान, गणेश भोसले यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यास जीवाचे बरे-वाईट करून घेण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्त असतानाही न्यायालयाच्या आदेशानुसार ताबा घेण्याच्या कारवाईत अडथळा निर्माण झाल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही संबंधित मालमत्तेचा ताबा देण्यास विरोध करून कारवाईत अडथळा आणल्याने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास इंदापूर पोलिसांकडून सुरू आहे.







