कात्रज, (पुणे) : दोन पीएमपीएल बसमध्ये सापडून कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (ता. ११) दुपारी कात्रज चौकात घडली आहे. कात्रज जुन्या बसस्थानकाजवळ ‘पीएमपीएल’ची बस तांत्रिक कारणामुळे बंद पडली होती. ती बस टोइंग करून काढण्यासाठी कंत्राटी कामगार गेला होता, त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. गणेश गुजर (वय ४२ रा. कोथरूड, मुळ गाव, भोर ) असे मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगाराचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुजर हे कंत्राटी मकॅनिक कामगार म्हणून कात्रज आगारात काम करत होते. कात्रज-हिंजवाडी बस बंद पडल्याने ती बस दुसऱ्या बसद्वारे टोईंग करुन बाजूला घेत होते. बस बाजूला घेताना टोईंग करण्यासाठी लावलेला रॉड सटकला व दोन बसच्या मध्ये गणेश गुजर सापडले. या घटनेत कंत्राटी कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, ही दुर्घटना घडताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे व वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.