पुणे : संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर पूर्ण देशाचे आराध्य दैवत समजले जाणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पावनभूमीत म्हणजेच पुणे शहरात महानगरपालिकेकडून छत्रपती शिवरायांबद्दल अवमानास्पद प्रकार घडत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.याबाबत काँग्रेसने महापालिकेला बारा तासाचा अल्टिमेट दिला आहे.

पुणे शहर हे छत्रपती शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेले ठिकाण असून शहराच्या जडणघडणीत छत्रपती शिवरायांच्या विचारसरणीचा मोठा वाटा आहे. मात्र पुणे महापालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कचरा उचलण्यासाठी लावलेल्या सर्व यंत्रणांवर छत्रपती शिवरायांचे छायाचित्र असलेले पुणे महानगरपालिकेचे बोधचिन्ह आहे. शहरातील कचरा उचलण्यासाठी असणाऱ्या गाड्यांवर छत्रपती शिवरायांचा फोटो लावणे हा पुणेकर जनतेचा व महाराष्ट्रातील तमाम नागरिकांचा अवमान आहे. असा आरोप काँग्रेसने केला आहे. या आरोपाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महापालिकेने पुढील बारा तासांमध्ये त्वरित कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असं पत्र काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना दिल आहे.
पुणे महानगरपालिकेने छत्रपती शिवरायांचा फोटो कचरा गाडीवर लावून मराठी अस्मितेशी द्रोह केलेला असून याबाबत पुणेकरांच्या भावना प्रक्षुब्ध आहे.१२ तासांच्या आत कचरा गाड्यांवरील छत्रपती शिवरायांचे छायाचित्र असलेले बोधचिन्ह न हटविल्यास पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान महापालिकेतून या पत्राची त्वरित दखल घेण्यात आली असून यावर कारवाईला देखील सुरुवात केली असल्याचं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आल आहे.








