पुणे : गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या कात्रज डेअरीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांसाठी खास पेशवाई श्रीखंड आणि आम्रखंड बाजारात उपलब्ध करून दिले आहे. या डेअरीच्या पेशवाई श्रीखंड आणि आम्रखंडने पुणेकरांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे, कारण ते प्रामाणिक चव आणि शुद्धतेसाठी व भेसळविरहीतसाठी प्रसिद्ध आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने कात्रज डेअरीचे अर्धा किलो पेशवाई श्रीखंड १४० रुपये, अर्धा किलो आम्रखंड १४५ रुपये, बासुंदी ४०० ग्राम १२० रुपये दराने बाजारात दाखल झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कात्रज डेअरी ही पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची सहकारी संस्था आहे, जी ग्राहकांना उच्च दर्जाचे दुग्धजन्य पदार्थ पुरवण्यासाठी वचनबद्ध आहे.गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या कात्रज डेअरीने एनडीडीबीच्या गुणवत्ता चिन्हासह आयएसओ २२०००:२०१८ आणि आयएसओ १४००१:२०१५ प्रमाणपत्रे मिळविलेली आहेत.गुढीपाडव्यादरम्यान वाढत्या मागणीच्या अपेक्षेने, कात्रज डेअरीने उत्पादन वाढवले आहे.
गेल्या वर्षी संघाने ११ टन श्रीखंड, १० टन आम्रखंड आणि २.५ टन बासुंदी विकली होती. यावर्षी, सरासरी विक्रीत ३०% वाढ होण्याचा अंदाज असल्याचे अध्यक्ष ढमढेरे यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आताच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली असल्याचं त्यांनी सांगितल आहे.डेअरीच्या विक्रीचा लाभ हा शेतकऱ्यांना होत असल्याने ग्राहकांनी कात्रजची दर्जेदार उत्पादने खरेदी करावीत.सर्वानी या गुढीपाडव्याला कात्रजच्या शुद्ध, उच्च दर्जाच्या श्रीखंड आणि आम्रखंडाचा आस्वाद घेण्याचे आवाहन ढमढेरे यांनी केले आहे.
दरम्यान रमजान ईदमध्ये मुस्लिम ग्राहकांना कात्रज डेअरी एक विशेष भेट देत आहे. कात्रज डेअरी मिल्क पार्लरमध्ये मोठ्या प्रमाणात दूध खरेदी करणाऱ्यांसाठी सवलतीच्या दरात दूध उपलब्ध करून देण्यात आले आहे.