पुणे : चांदणी चौकातील एकात्मिक उड्डाणपूलाचे काम वेगाने पूर्ण करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. या प्रकल्पाची बुधवारी (ता.२) जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी पाहणी करून प्रकल्प पूर्ण करण्याच्यादृष्टीने उर्वरीत कामाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते. आतापर्यंत या प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जून २०२३ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. जुना पूल पाडल्यामुळे सध्या सेवा रस्त्यासाठी व इतर कामासाठी दोन्ही बाजूचे खडकाचे खोदकाम प्रगतीत आहे.
दरम्यान , पुलाच्या ठिकाणी मुंबई-सातारा दिशेला पाच लेन व सातारा-मुंबई साठी तीन लेन अशा एकूण आठ लेन वाहतुकीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच साताऱ्याकडून एनडीए मार्गे मुंबईला जाण्यासाठी अतिरिक्त दोन लेन उपलब्ध आहेत.