पुणे : पुणे महापालिकेत नागरिकांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या तक्रार निवारण कक्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांच्या तक्रांरीचा पाऊस पडला. अतिक्रमण, रस्ते, तसेच कचरा अशा तक्रारींचा प्रामुख्याने यामध्ये समावेश होता. पहिल्याच दिवशी या कक्षाच्या माध्यमातून तब्बल 45 तक्रारी आल्या होत्या. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.
मागील तीन वर्षापासून महापालिका निवडणुका रखडल्याने महापालिकेवर प्रशासक नियुक्ती करण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांना दैनंदिन भेडसावणाऱ्या तक्रारी मांडण्यासाठी महापालिकेत गेल्यानंतर अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे मिळत होती. मात्र आता या निवारण कक्षाच्यां माध्यमातून नागरिकांना आपल्या तक्रारी आठवड्यातून दोन वेळा आणि त्या सुद्धा महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या समोर मांडता येणार आहेत.
महापालिकेतील दोन्ही अतिरिक्त आयुक्त सोमवारी आणि गुरुवारी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणार आहेत. या तक्रारींवर आवश्यक तो अभिप्राय लिहून अतिरिक्त आयुक्त संबंधित विभागाकडे पाठविणार आहेत. गुरुवारी या कक्षाची सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ४५ तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी या तक्रारी ऐकून आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यामध्ये सर्वाधिक तक्रारी या अनधिकृत बांधकामांविषयीच्या होत्या. याशिवाय, रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, घनकचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित होत्या.