उरुळी कांचन, ता.२७ : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाचे राज्यात पुन्हा एकदा आगमन होणार असल्याचा अंदाज आहे. येत्या २ ते १५ सप्टेंबरपर्यंत सर्वदूर समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे एका खाजगी कार्यक्रमात ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी पावसाचा अंदाज वर्तवला. डख म्हणाले, ‘पावसाळ्याला सुरुवात होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरीदेखील आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे पूर्व हवेलीतील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व वाढते तापमान रोखण्यासाठी वृक्ष लावगड व संवर्धन मोहीम प्रत्येक गाव व वाड्या वस्त्यावर राबविण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे जमिनीची धूप होणार नाही व अवकाळी पाऊस होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पशु, पक्षी, झाडे व वातावरणातील काही नैसर्गिक बदल पावसाचा अंदाज देऊ शकतात, असे म्हणत भविष्यात पडणारा अवकाळी पाऊस, त्यातून होणारे शेती पिकांचे नुकसान, यासह अधिकाधिक उतारा देणारे सोयाबीनचे वाण, या विषयावर त्यांनी या कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली.
गावरान आंबा जास्त पिकणे ही दुष्काळाची लक्षणे…
गावरान आंबा जास्त पिकणे, बिब्याच्या झाडाला बिबे जास्त लागणे, ही दुष्काळाची लक्षणे आहेत. नदी, नाले, तलाव, धरणे, आंब्याचे झाड, लिंबाचे झाड, उंच खांब, झाडे इत्यादी ठिकाणी खूप विजा पडतात. हाच विजांचा पाऊस पिकांसाठी खूप पोषक असल्याचे ते म्हणाले.
कडूलिंबाच्या झाडाला लिंबोळ्या येणे ही चांगल्या मान्सूनची लक्षणे..
जांभूळ लवकर पिकणे अस्थमाच्या रुग्णांना दम्याचा त्रास होणे, दिव्यांवर कीटक पतंगे खेळणे, कडुलिंबाच्या झाडाला जास्त लिंबोळ्या येणे ही सर्व चांगल्या मॉन्सूनची लक्षणे आहेत.