Colon Cancer Symptoms : हल्लीच्या धकाधकीच्या जीवनशैलीने तरुणांच्या आरोग्यासमोर एक नवं संकट उभं केलं आहे. कोलन कॅन्सरचं वाढतं प्रमाण. पूर्वी हा आजार प्रामुख्याने वयस्करांमध्ये आढळायचा, मात्र आता 30 ते 45 वयोगटातील तरुणांमध्येही त्याचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. बदललेली जीवनशैली, अनियमित आहार, फास्ट फूडचं वाढतं सेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव हे यामागचं मुख्य कारण मानलं जातं.

तज्ज्ञांच्या मते, या आजाराचं सर्वात धोकादायक वैशिष्ट्य म्हणजे त्याची सुरुवातीची लक्षणं खूपच सौम्य असतात. त्यामुळे अनेकदा रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आजार पुढच्या टप्प्यावर पोहोचतो. डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार 5 महत्त्वाची लक्षणं विशेष लक्ष देण्यासारखी आहेत.
पहिलं लक्षण म्हणजे शरीरात लोहाची कमतरता (अॅनिमिया), ज्यामुळे सतत थकवा, त्वचा फिकट पडणे किंवा श्वास लागणे अशी लक्षणं दिसतात. दुसरं म्हणजे पचनसंस्थेतील बदल बद्धकोष्ठता किंवा वारंवार अतिसार. तिसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे कोणताही प्रयत्न न करता अचानक वजन कमी होणं. चौथं म्हणजे पोटात सतत वेदना, पेटके किंवा थोडं खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखं वाटणं. आणि पाचवं, सर्वात गंभीर लक्षण म्हणजे शौचात रक्त येणं.
हे लक्षणं इतर साध्या आजारांमध्येही दिसू शकतात, त्यामुळेच गोंधळ होतो. पण हीच गोष्ट धोकादायक आहे. कारण कोलन कॅन्सर जर वेळेत ओळखला गेला नाही, तर तो शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो आणि उपचार कठीण होतात.
हा आजार आता “लाइफस्टाइल डिसीज” बनत चालला आहे. त्यामुळे नियमित व्यायाम, संतुलित आहार, फायबरयुक्त अन्न आणि वेळेवर आरोग्य तपासणी यांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास अनेक जीव वाचू शकतात.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती ही केवळ सामान्य माहिती असून वैयक्तिक वैद्यकीय सल्ला नाही. कोणताही उपचार, औषध किंवा उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या माहितीद्वारे घेतलेल्या निर्णयांमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी Pune Prime News जबाबदार राहणार नाही.






