उरुळी कांचन, (पुणे) : थकीत असलेल्या घरपट्टी व पाणीपट्टीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीतर्फे चक्क ढोल-ताशे वाजवून सोमवारी (ता. ३१) पासून सुरुवात करण्यात येणार आहे. याबाबत जाहीर निवेदनहि देण्यात आले आहे. अशी माहिती उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस यांनी दिली आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या नागरिकांची थकबाकी वसुलीसाठी सोमवारपासून खातेदारांच्या घरी जाऊन पाणीपट्टी, घरपट्टी वसुली करण्यात येणार आहे. तसेच थकीत खातेदारांची नावे ग्रामपंचायत मार्फत सार्वजनिक ठिकाणी, चौकात, ग्रामपंचायत कार्यालायाबाहेर, फ्ल्केसद्वारे लावण्यात येणार असून थकीत खातेदारांच्या घरासमोर बँड वाजवून ग्रामपंचायत मार्फत वसुली करण्यात येणार आहे.
दरम्यान, उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व खातेदारांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. तरी संबंधित नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय, सबंधित वसुली अधिकारी, ऑनलाईन मार्फत घरपट्टी, पाणीपट्टी, भरून सहकार्य करण्याचे आवाहन डोळस यांनी केले आहे.
याबाबत ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस म्हणाले, “उरुळी कांचन ग्रामस्थांच्या भावना दुखावण्याचा ग्रामपंचायतीचा हेतू नाही. नागरिकांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करून आपआपली घरपट्टी, पाणीपट्टी, भरून सहकार्य करावे.”