सातारा : आगामी काळात गड आणि किल्ल्यावरील अतिक्रमणे काढण्यात येणार असून गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असून कोठेही निधीची कमतरता पडणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
आज प्रतापगड येथे शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिंदे बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री मंगलप्रभात लोढा आदी नेत्यांची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकविण्याचे भाग्य मिळाले असून हा परिसर महापराक्रमी राज्याच्या पराक्रमाची साथ देणार परिसर आहे. ही माती पराक्रमाची साक्ष देते. येथे येताना कार्यकर्ते आणि शिवभक्तांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद समाधान देणारा होता. असे शिंदे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या गडांची बांधणी पाहून आश्चर्य वाटते.
गडाचे प्रवेशद्वार, पाण्याची साठवण, तोफा यांची भव्यता पाहून सध्याचे जग अजूनही किती मागे आहे, अशी भावना येते, असेही एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले.