नांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुती सरकार सत्तेत आले. त्यानंतर मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी आता मोठा निर्णय घेत मंत्री अतुल सावे यांना मोठा धक्का दिला आहे. अतुल सांवेनी मंजूर केलेल्या नांदेडच्या तांडा वस्तीच्या 7 कोटी 25 लाखांच्या कामांना त्यांनी स्थगिती दिली आहे.
भाजप आमदार तुषार राठोड यांनी अतुल सावे यांनी आम्हाला विश्वासात न घेता ताडा वस्तीच्या कामांना मंजुरी दिल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केली आहे. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय म्हणजे अतुल सावे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होऊन आतापर्यंत चार महिने झाले आहेत. या चार महिन्यात अनेक घडामोडी घडून आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या आरोग्य विभागातील 3200 कोटींच्या कामांना देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता अतुल सावे यांनी मंजूर केलेल्या कामांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याची माहिती समोर येत आहे.