मुंबई : ‘दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे.’ अशी प्रतिकिया मुंबई रेल्वे रुळावर घडलेल्या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 9, 2025

आज (सोमवारी 9 जून) सकाळी मध्य रेल्वेमार्गावर मोठा अपघात झाला. पुष्पक एक्स्प्रेस, कसाऱ्याच्या दिशेने जात असताना काही प्रवासी रेल्वेमधून खाली ट्रॅकवर पडले. या घटनेत 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून जखमी प्रवाशांवर सध्या उपचार सुरु आहेत. या घटनेत 8 प्रवासी रुळावर पडले होते. या घटनेची माहिती मिळताच तातडीने रुग्णावाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.

या घटनेच्या काही तासांनंतर ही घटना कशी घडली? याबाबत माहिती समोर आली आहे. रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन लोकल एकमेकांच्या जवळून गेल्याने हा प्रकार घडला. एक लोकल कसाऱ्याच्या दिशेनं येत होती. तर, दुसरी लोकल सीएसएमटीच्या दिशेनं जात होती. यादरम्यान, गर्दीमुळे दारावर लटकून उभे असलेले प्रवासी रुळावर पडले आणि ही दुर्दैवी घटना घडली. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, या घटनेचा आता खोलवर तपास सुरु असून, नेमकं कारण लवकरच स्पष्ट होईल.







