पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर येणार आहेत. चिंचवड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, कार्यक्रम स्थळाभोवतीच्या १७ उंच इमारतींच्या टेरेस आणि बाल्कन्या पोलिसांनी हायजॅक केल्या आहेत. या इमारतीवरून विशेष नजर असणार आहे.तसेच या समारंभासाठी एकूण ३०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून उच्च पदस्थ पोलीस अधिकारी यावर लक्ष ठेवून असणार आहेत.तसेच यावेळी स्थानिक पोलिसांसह दंगा नियंत्रण पथक, बॉम्ब शोध पथक, श्वान पथक, सायबर सुरक्षा युनिट आणि गुप्तचर विभागाचाही यामध्ये समावेश आहे. कार्यक्रम स्थळाभोवती झोनिंग करून प्रत्येक सेक्टरवर स्वतंत्र अधिकारी आणि पोलिस तैनात असणार आहेत.
या कार्यक्रमस्थळी आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे उभारण्यात आले असून सर्व फुटेज थेट कंट्रोलमध्ये पोहचणार असल्याची माहिती समोर आली आहे.सुरक्षा दृष्टीने परिसरातील इमारती ‘हायजॅक’ केल्या असून, टेरेसवर सशस्त्र जवान, वायरलेस कम्युनिकेशन यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल वरून त्वरित टिपता यावी, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.