Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी रात्री एकाच वेळी दोन वेगवेगळ्या आगीच्या घटना घडल्या आणि दोन्ही वेळा मोठी दुर्घटना टळली.

पहिली घटना एका लग्नात घडली. समारंभ रंगात आला होता, फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. पण अचानक फटाक्यांची ठिणगी लग्नाच्या सेटलाच लागली आणि काही क्षणात सेटला चांगलीच आग भडकली. एवढ्यात वऱ्हाडी मंडळींमध्ये एकच आरडाओरडा सुरू झाला. नवरदेव-नवरीही थोडक्यात बचावले. पडेगाव परिसरातील हा प्रकार असून लग्नात तब्बल चार हजार लोक होते. उपस्थित काहींनी धाडस करून पाणी, चादरी घेऊन आग आटोक्यात आणली, तेव्हा सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. (Chhatrapati Sambhajinagar)
दुसरी घटना मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या कार्यक्रमात घडली. एका आईस्क्रीम दुकानाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. सोहळा रंगात आला होता म्हणून सजावटीसाठी गॅसचे फुगे आणले होते. पण नेमकं विनोद पाटील फुग्यांच्या जवळ येताच अचानक मोठा स्फोट झाला. फुगे फुटताच जोरदार भडका उडाला. सुदैवाने पाटील तात्काळ बाजूला झाले आणि तिथले लोकही तत्परतेनं दूर गेले, त्यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही.
या दोन घटनांनी शहरात एकच चर्चेला उधाण आलं. एका बाजूला लग्नातील फटाक्यांचा उरक तर दुसऱ्या बाजूला फुग्यांचा स्फोट दोन्ही ठिकाणी थोडक्यात मोठी दुर्घटना टळली.







