पुणे: सातबारा उतारा काढण्याची (Digital 7/12) प्रक्रिया आता अधिक सोपी आणि जलद झाली आहे. नागरिकांना (Online 7/12) अवघ्या काही (Death Certificate) मिनिटांत डिजिटल सातबारा उतारा (Birth Certificate) मिळू शकणार आहे. पुणे जिल्ह्यात सातबारा उतारे, जन्म-मृत्यूचे दाखले तसेच इतर सात महत्त्वाच्या कागदपत्रांचे स्कॅनिंग काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाले आहे. सध्या हे काम 60 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले असून उर्वरित प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी दिले आहेत.

कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना अगदी जुने उतारेदेखील एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्याचा प्रकल्प तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या काळात सुरू करण्यात आला होता. पुणे जिल्ह्यात 13 तहसील कार्यालये, 11 उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालये आणि 3 नगर भूमापन कार्यालये असून एकूण 27 कार्यालयांमधील कागदपत्रे या प्रकल्पात समाविष्ट आहेत. या सर्व कार्यालयांमधील सुमारे 3 कोटी 21 लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग केले जाणार आहे. यासाठी 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या प्रकल्पाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील सुमारे 100 वर्षांपूर्वीचे सातबारा उतारे, 1930 पासूनचे जन्म आणि मृत्यूचे दाखले, फेरफार नोंदी, आठ अ, कडई पत्रे आणि इनाम पत्र अशी सात प्रकारची कागदपत्रे स्कॅन केली जात आहेत. एकूण 3 कोटी 31 लाख 473 कागदपत्रे स्कॅन करण्याचे नियोजन असून त्यापैकी 2 कोटी 38 लाख 622 कागदपत्रे उपलब्ध आहेत. सध्या त्यापैकी 1 कोटी 57 लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण झाले असून सुमारे 80 लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग बाकी आहे.
स्कॅनिंग झाल्यानंतर ही कागदपत्रे वाचनीय आहेत की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर मेटा डेटा एन्ट्री करून ही माहिती पत्र जमावबंदी आयुक्तालयाकडे पाठवली जाईल. तेथून तालुकानिहाय पडताळणी झाल्यानंतर सातबारा आणि इतर कागदपत्रे पूर्णपणे डिजिटल स्वरूपात नागरिकांना उपलब्ध होतील. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत आणि जमिनीशी संबंधित कामे अधिक पारदर्शक आणि सोपी होणार आहेत.







