‘Chhatrapati Sambhaji Maharaj’ : उरुळी कांचन, (पुणे) : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उरुळी कांचन येथील मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने यंदा अभूतपूर्व सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मृत्युंजय प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश उत्तम कांचन यांनी दिली आहे.

यापुढे बोलताना योगेश कांचन म्हणाले, “यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे उरुळी कांचन पंचक्रोशीत प्रथमच सादर होणारा ‘भव्य दिव्य शिव-पार्वती विवाह सोहळा’ आणि ‘महाकाल भस्म आरती’, या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवारी (ता. 15) सायंकाळी सहा ते ते रात्री दहा वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचा कार्यक्रम हा उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील आश्रम रोडवरील मणिभाई देसाई पतसंस्थेसमोर करण्यात येणार आहे. यंदाचे हे उत्सवाचे 11 वे वर्ष असून मिरवणुकीमध्ये विविध कलाप्रकार सादर केले जाणार आहेत. यामध्ये मुख्यत्वेकरून शिव-पार्वती विवाहाचा जिवंत देखावा आणि अंगावर शहारे आणणारी महाकाल भस्म आरती हे भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असतील.
या मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांच्या गजरासोबत एसआरएस (SRS) पैलवान साऊंड आणि आरएस (RS) लाईटची भव्य रोषणाई करण्यात येणार आहे. केवळ उत्सवच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर उरुळी कांचन बायफ रोड येथील तांबे वस्ती, कांचन पार्क येथे सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
दरम्यान, या सोहळ्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल व भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मृत्युंजय प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश उत्तम कांचन (पाटील) असून, त्यांनी या ऐतिहासिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.







