पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर सुमारे २० वर्षे विकासापासून दुर्लक्षित असलेल्या चऱ्होली आणि परिसराला भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात सोन्याचे दिवस आले आहेत. अहमदनगर महामार्गाला आणि मुंबईला जोडणारा वर्तुळाकार मार्ग (रिंग रोड) विकसित करण्याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) प्रस्तावाला मान्यता दिली आहे, अशी माहिती माजी महापौर नितीन काळजे यांनी दिली.
पुणे महापालिकेच्या हद्दीलगच्या भागातून ‘रिंग रोड’ प्रस्तावित केला आहे. ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून हा रस्ता होणार असून, अनेक वर्षांपासून रखडेल्या या रस्त्यासाठी सर्वेक्षण आणि भूसंपादनाचे काम केले जात आहे. ६५ मीटर रुंदीच्या या रस्त्याचा काही भाग हा वाघोली येथून लोहगावमधून पिंपरी-चिंचवड हद्दीमध्ये येतो. चऱ्होलीत या रस्त्याचा प्रवेश होणार असून, त्यामुळे चऱ्होलीसह परिसराच्या विकासाला आणखी मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.
पुणे- नाशिक महामार्ग आणि पिंपरी-चिंचवडसह समाविष्ट गावांतील वाहतूक सक्षम व्हावी. या करिता इंद्रायणी नदीला समांतर जोड रस्ते विकसित करण्यात यावेत. तसेच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, महापालिका प्रशासनाच्या हद्दीतील रस्ते जोड प्रकल्प हाती घेण्यात यावा, अशी आग्रही मागणी भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली होती. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. त्यानंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत ‘रिंग रोड’च्या कामाला गती दिली आहे, असेही नितीन काळजे यांनी म्हटले आहे.
माजी महापौर नितीन काळजे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीची सत्ता २०१७ मध्ये महापालिकेत आली. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने समाविष्ट गावांतील विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर सुमारे २० वर्षे समाविष्ट गावांतील नागरिकांना पायाभूत सुविधांसाठी झगडावे लागले. विकास आराखड्यानुसार रस्ते आणि ड्रेनेज लाईचा विकास करण्यात आला. त्यामुळे चिखली-मोशी-चऱ्होली हा रेसिडेन्सिअल कॉरिडॉर विकसित होत आहे. मोठ्याप्रमाणात या भागात विकास होत असल्यामुळे पिंपरी-चिंचवडचे पूर्व प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाईल, असा विश्वासह काळजे यांनी व्यक्त केला.
‘पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता अशोक भालकर म्हणाले की, लोहगाव- वाघोलहून पिंपरी-चिंचवडला जोडणारा रिंगरोडबाबत प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. वन विभागाच्या हद्दीत सुमारे ६०० मीटर आणि पुणे महापालिका हद्दीत ६ किलीमीटर लांबीच्या रस्ता विकसित करण्यासाठी पीएमआरडीएकडे हस्तांतरण करण्यात आले. तसा प्रस्ताव तयार केला असून, ६५ मीटर रुंदीचा रस्ता प्रशस्त होईल. त्यामुळे सोलापूर आणि नगर रोडहून येणारे ‘ट्रॅफिक’ जुन्या पुणे-मुंबई रोडवर येणार नाही. पिंपरी-चिंचवड बाहेरुन मुंबईला जाणे सुलभ होईल. परिणामी, रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिक विकासासह जीवनशैली उंचावण्यास मदत होईल.
‘पीएमआरडीए’ आणि पुणे महापालिकेच्या माध्यमातून वाघोली-लोहगावमधून पिंपरी-चिंचवडला जोडणारा ६५ मीटर रुंदीचा रिंग रोड विकसित करण्याबाबत प्रस्ताव आहे. हा रस्ता झाल्यास नगर रोडहून येणारी वाहनांना मुंबईकडे जाण्याचा प्रवास सुकर होणार आहे. महापालिका हद्दीलगच्या रस्त्यांचा विकास केल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास निश्चितपणे मदत होईल. अशी प्रतिक्रिया माजी महापौर नितीन काळजे यांनी दिली आहे.