अजित जगताप
सातारा : सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक आय पी एस अधिकारी समीर शेख यांना केंद्रीय गृहमंत्री 2022 चे विशेष ऑपरेशन पदक जाहीर झाले आहे.याबद्दल त्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांची नुकतीच सातारा पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. यापूर्वी समीर शेख यांनी साताऱ्यात पोलीस उपअधीक्षक म्हणून २०१८ मध्ये दमदार कामगिरी केली होती. सतरा महिन्यात त्यांनी साताऱ्यात धडक कामगिरी केली.पोलीस कार्यालयामध्ये त्यांनी एम.पी.एस.सी आणि यू.पी.एस.सी.च्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्य ग्रंथालय तयार केले होते.
सातारा शहर येथील मटका आणि जुगार अड्ड्यांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हेगारांमध्ये पोलीस अधिक्षक शेख यांनी कायदा व सुव्यवस्था राखली होती.साताऱ्यातील खासदार-आमदार समर्थकांच्या सातारा शहरातील सुरूची राडा प्रकरणाचा तपास समीर शेख यांनी केला होता. शंभर हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला. यंदाच्या वर्षी आय पी एस समीर शेख व पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांना केंद्राचे विशेष पदक जाहीर झाला आहे.
देशभरातून निवडलेल्या भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून मीरारोड येथील समीर अस्लम शेख या अधिकाऱ्याने यंदा नवा अध्याय लिहिला आहे. ठाणे जिल्ह्य़ातील मीरा रोड येथील शांती पार्क भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीय शेख कुटुंबातील समीर हा थोरला मुलगा. तेथील सेंट झेवियर्स शाळेत शिकलेले आहेत. वाचनाची प्रचंड आवड असून महाविद्यालयीन शिक्षण घेताना मुंबईचे धडाडीचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या शौर्यगाथा वाचल्यानंतर समीरनेही भविष्यात पोलीस अधिकारी बनून देशसेवा करण्याचे ठरवले. दहावीत चांगले गुण मिळाल्याने विलेपार्ले येथील नावाजलेल्या साठय़े महाविद्यालयात विज्ञान शाखेत त्याने प्रवेश घेतला. त्याचे वडील अभियंता असल्याने त्याने अगोदर अभियांत्रिकीची पदवी घेण्याचे ठरवले. उत्तम गुण मिळाल्याने बिट्स पिलानीसारख्या नामांकित संस्थेत ते दाखल झाले. इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशनसारखी शाखा मिळाली.
पदवीधर होत असतानाच यू.पी.एस.सी.च्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. मात्र पहिल्या प्रयत्नात तो अपयशी ठरला. या अपयशाने खचून न जाता त्याने अधिक गांभीर्याने या परीक्षेकडे पाहिले. सनदी व पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्याशी चर्चा करून अभ्यासाची दिशा ठरवली. मित्रांनी सुचवल्यानुसार या परीक्षेच्या तयारीसाठी काही महिने ते दिल्लीत गेले. दिवसभर आठ ते दहा तास अभ्यास केला. मुख्य परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीसाठी त्यांनी विशेष सराव केला. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसोबत चालू घडामोडींमधील एखाद्या विषयाचा विविध अंगाने कसा विचार होऊ शकतो, याचा सराव केला. कठोर परिश्रम केल्याने मग यश मिळाले आणि पसंतीची पोलीस सेवाही मिळाली.
हैदराबाद येथील सरदार पटेल अॅकॅडमी तसेच देशाच्या विविध भागांत १३६ अधिकाऱ्यांच्या तुकडीला प्रशिक्षण दिले गेले. जातीय दंगलींपासून ते मतदानासारख्या संवेदनशील घटनांच्या वेळी परिस्थिती कशा प्रकारे हाताळावी याचा यात समावेश होता. ४५ आठवडय़ांचे हे प्रशिक्षण संपल्यानंतर अॅकॅडमीत या अधिकाऱ्यांचा दीक्षान्त समारोह झाला. या काळात अष्टपैलू कामगिरी बजावल्याबद्दल समीर शेख याला ‘पंतप्रधानांचे बॅटन’ तसेच ‘केंद्रीय गृहमंत्र्यांचे रिव्हॉल्व्हर’ प्रदान करण्यात आले.त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री-२०२२चा विशेष ऑपरेशन पदक ही जाहीर झाल्याने त्यांनी पुरस्काराची हट्रिक केली आहे.त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील मुलांनी प्रशासकीय व इतर यंत्रणा मध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी हजारो स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट देण्याचा संकल्प केला आहे. त्याला सातारा जिल्ह्यात मोठा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.