Satara Dhom Dam News : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ओझर्डी गावात धोम धरणाचा कालवा फुटल्याने संपूर्ण गावामध्ये पाणी शिरलं आहे. या घटनेनंतर जवळपास १५० ऊसतोड मजुरांना बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र त्यांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने मोठं नुकसान झालं आहे. आज १६ डिसेंबरला मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही मोठी घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा पांडे गावच्या हद्दीत फुटला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले. यामुळे या ओढ्याला पुराचे स्वरूप आले. यामध्ये झोपेत असलेल्या ऊस मजुरांचा संसार वाहून गेल्याने मोठं नुकसान झालं आहे.
घटनेनंतर रातोरात जवळपास १५० ऊसतोड मजूरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात तसेच १२ बैलांना वाचवण्यात यश आलं आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र मजूरांचे संसारउपयोगी साहित्य वाहून गेले आहे. तसेच २ बैलं पुरामध्ये वाहून गेले आहेत.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, भुईंज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटे चार वाजता वाजल्यापासून ऊसतोड मजुरांना मदत प्रशासनाकडून सुरू होती. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.