उरुळी कांचन, (पुणे) : घरात कोणी नसल्याची संधी साधत बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे पाऊणे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील आश्रम रोडवरील आय.डी.बी.आय बँकेच्या वरती, पार्थ सारथी बिल्डिंगमध्ये बुधवारी (ता. 01) सकाळी अकरा ते रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
याप्रकरणी उत्तम नारायण जवळकर (वय 53, व्यवसाय- शेती, रा. आश्रम रोड, पार्थ सारथी बिल्डिंग, आय.डी.बी.आय बँकेच्या वरती उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम जवळकर हे शेतकरी आहेत. घराला कुलूप लावून ते शेतात गेले होते. यावेळी संध्याकाळी घरी आले असता त्यांना घराच्या मुख्य दाराचे सुरक्षा लॉक आणि कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. घरात जाऊन पाहणी केली असता कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, घड्याळ, मनगटी स्मार्टवॉच, रोख रक्कम असा सुमारे पाऊणे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, जवळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मटाले करीत आहेत.
बड्या राजकीय नेत्याची बुलेट चोरीला..
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील महात्मा गांधी रस्त्यावर असलेल्या श्रीकृष्ण मंदिराशेजारी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष कांचन राहतात. ते राहत असलेल्या कॉम्प्लेक्सखाली शुक्रवारी (ता. 27) संध्याकाळी बुलेट लावली होती. दुसऱ्या दिवशी लावलेल्या ठिकाणी बुलेट दिसून आली नाही. त्यांनी बुलेटचा आजुबाजुच्या गावात तसेच परिसरात शोध घेतला मात्र बुलेट मिळुन आली नाही. त्याठिकाणी असलेले सी.सी.टिव्ही चेक केले असता रात्री एक वाजता दोन इसम सायकलवरून येवुन त्यापैकी एकाने बुलेटचे स्वीच वायर तोडुन चोरून नेत असताणा दिसून आले.
दरम्यान, कांचन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढत्या चोरीच्या घटनेने परिसरातील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण असून उरुळी कांचन व परिसरात पेालिसांची रात्रगस्त होतच नसल्याची तक्रार येथील नागरिकांनी ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना केली आहे.