पुणे : पुण्यातील येवलेवाडी परिसरात वासरांवर अमानुष अत्याचार करून त्यांची हत्या केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या वासरांचे डोळेही काढण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांत अशा स्वरूपाची ही तिसरी किंवा चौथी घटना असल्याचा दावा करण्यात येत असल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी संबंधित व्यक्तीने काही महिन्यांपूर्वीच पोलिसांत एफआयआर दाखल केला होता. मात्र, त्यानंतरही अशा घटना थांबलेल्या नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुक्या प्राण्यांवर होणारे हे अत्याचार अत्यंत संतापजनक असून, अशा कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, प्राण्यांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलिस आणि संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. परिसरातील जनावरांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी आर्त विनंती प्राणीप्रेमींकडून करण्यात येत आहे.








