पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे विहीर खोदण्याचे काम सुरू असताना अचानक दगड-मातीचा ढिगारा कोसळून मोठी दुर्घटना घडली. या ढिगाऱ्याखाली चार कामगार अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबे येथील शेतकरी निवास शिंदे यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू होते. सुमारे ३० फूट खोल विहीर खोदली जात असताना अचानक दगड आणि मातीचा मोठा ढिगारा कामगारांच्या अंगावर कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कामगारांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे ते ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जेसीबीच्या सहाय्याने दगड-मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. लवकरच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) टीम घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगोटे यांनी दिली.

दरम्यान, या दुर्घटनेत नेमके किती कामगार अडकले आहेत आणि त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. बचावकार्य सुरू असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.







