मुंबई : मुंबईतील सर्वात व्यस्त आणि ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. शनिवारी सायंकाळी सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, कसून तपासणी केल्यानंतर ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास आपत्कालीन क्रमांक 112 वर हा धमकीचा संदेश प्राप्त झाला. 9420112655 या मोबाईल नंबरवरून संपर्क साधत एका अनोळखी व्यक्तीने CSMT स्थानकात स्फोटक ठेवण्याची धमकी दिली होती. या गंभीर इशाऱ्याची दखल घेत मुंबई पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या आणि संपूर्ण स्थानक परिसराला घेराव घातला.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत घटनास्थळी बॉम्ब शोधक व नाशक पथकासह श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. रेल्वे स्थानकाचे फलाट, प्रतीक्षालय आणि इतर संवेदनशील भागांची या पथकांनी अत्यंत बारकाईने पाहणी केली. सुमारे अडीच तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर रात्री 9 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास ही तपासणी थांबवण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक पदार्थ हाती लागले नाहीत.

या घटनेची सविस्तर माहिती लोहमार्ग पोलिसांनी मुख्य नियंत्रण कक्षाला कळवली आहे. सध्या सायबर सेल आणि पोलीस पथकांच्या मदतीने 9420112655 या क्रमांकाचा वापर करणाऱ्या संशयिताचा कसून शोध घेतला जात आहे. हा कॉल कोणी आणि कोणत्या हेतूने केला, याचा तपास सुरू असून मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.








