पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सतत घसरण होत आहे. जरी रविवारी, 15 नोव्हेंबर 2026 रोजी दरांमध्ये कोणताही बदल झाला नसला, तरी मागील 10 दिवसांमधील आकडेवारीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि दिवाळीनंतर किरकोळ मागणीत झालेली घट यामुळे पिवळ्या धातूची चमक काहीशी मंदावली आहे.

गेल्या दहा दिवसांत सोन्याच्या दरात मोठी कपात झाली आहे. 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यामागे 8660 रुपयांनी, तर 22 कॅरेट सोने 7950 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या कालावधीत तब्बल पाच दिवस भावात घसरण नोंदवली गेली, ज्यामध्ये 10 ते 13 नोव्हेंबर दरम्यान सलग चार दिवस झालेली पडझड प्रामुख्याने महत्त्वाची ठरली. चांदीच्या बाजारात तर याहूनही मोठी घसरण झाली असून, अवघ्या दहा दिवसांत एक किलो चांदी तब्बल १५ हजार रुपयांनी घसरली आहे. नफावसुली आणि मागणी घटल्यामुळे चांदीच्या किमतींवर मोठा दबाव आला असून, सध्या दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या प्रमुख शहरांमध्ये एक किलो चांदी 1,95,000 रुपयांवर विकली जात आहे.
आजच्या सरासरी दरांचा विचार केला तर, दिल्लीमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव ,137,770 रुपये, 22 कॅरेटचा भाव 1,26,300 रुपये आणि 18 कॅरेटचा भाव 1,03,370 रुपये नोंदवला गेला आहे. तसेच मुंबई, कोलकाता आणि चेन्नई शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,37,620 रुपयांच्या आसपास आहे.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलर मजबूत होणे, अमेरिकन ट्रेजरी यील्डमध्ये झालेली वाढ आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील घडामोडी यामुळे धातूंच्या विक्रीत वाढ झाली आहे. आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमती आणि चलनाची चाल यावर सोन्या-चांदीचे भविष्य अवलंबून असेल. दरम्यान, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे सचिव सुरेंद्र मेहता यांनी 2027 च्या अखेरपर्यंत सोने 1,87 लाख आणि चांदी 5,45 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे.







