पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांच्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणातील सत्य समोर आणण्याचा सल्ला दिला आहे. ही क्लिप बनावट नसून पूर्णपणे खरी असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.

या संदर्भात बोलताना जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जर तुम्ही कोणताही गैरव्यवहार केला नसेल, तर घाबरण्याचे काहीच कारण नाही,” असे म्हणत त्यांनी शिंदे यांना या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आवाहन केले आहे. जरांगे यांच्या मते, संबंधित क्लिपमधील महिला अत्यंत आत्मविश्वासाने बोलत असून दिल्लीतील सूत्रांकडूनही ती खरी असल्याची माहिती मिळत आहे. जर या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले गेले आणि हा विषय हलक्यात घेतला, तर त्याचा थेट फटका ग्रामीण भागातील सामान्य कार्यकर्त्यांपासून ते मोठ्या नेत्यांच्या राजकीय भवितव्यापर्यंत सर्वांनाच बसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
या प्रकरणातील तपासाच्या पद्धतीवरही जरांगे पाटील यांनी ताशेरे ओढले आहेत. कोणताही अधिकृत गुन्हा दाखल होण्यापूर्वीच विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना होणे ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित व्यक्ती सत्ताधारी पक्षाशी निगडित असल्यामुळेच त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही आणि ही क्लिप खोटी ठरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. सामान्य नागरिक असता तर आतापर्यंत तुरुंगात गेला असता, असेही ते म्हणाले.

आपल्याकडे या प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे पुरावे आणि स्फोटक माहिती उपलब्ध असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. योग्य वेळ आल्यावर आपण हे सर्व पुरावे जनतेसमोर उघड करू, असे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांच्यामुळेच इतरांचे राजकीय अस्तित्व टिकून आहे, त्यामुळे आपल्याविरोधात रचले जाणारे षडयंत्र त्यांनी वेळीच मोडून काढावे आणि या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे.







