नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अंधश्रद्धेचा आधार घेऊन एका नवविवाहित तरुणीचा संसार मोडण्याचा धक्कादायक प्रयत्न समोर आला आहे. दिंडोरी तालुक्यातील एका 22 वर्षीय उच्चशिक्षित तरुणीला भोंदूबाबाने पतीच्या मृत्यूची भीती दाखवून हे लग्न तोडण्यासाठी दबाव टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दिंडोरी येथील या तरुणीने 31 ऑक्टोबर रोजी आपल्या पसंतीच्या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. मात्र, तिच्या माहेरच्या कुटुंबीयांना हा विवाह अजिबात मान्य नव्हता. कसेही करून हे लग्न मोडून काढायचे, या उद्देशाने नातेवाईकांनी 4 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास तिला सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात असलेल्या एका भोंदूबाबाच्या दरबारात नेले. तिथे या भोंदूने तरुणीच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी अघोरी प्रकार केले.
या भोंदूबाबाने तरुणीला धमकावत सांगितले की, जर तू तुझ्या पतीसोबत राहिलीस आणि हा संसार सुरू ठेवलास, तर पुढील 2 महिन्यांत तुझ्या पतीचा नक्कीच मृत्यू होईल. तिच्या मनात या गोष्टीची भीती बसावी, यासाठी भोंदूने तिला लिंबू आणि दोरा देखील बांधला. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात भोंदूगिरीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. यापूर्वी अशोक खरात नावाच्या भोंदूने महिलांची फसवणूक करून त्यांचे शोषण केल्याची घटना ताजी असतानाच, आता हा नवा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

उच्चशिक्षित तरुणीसोबत असा प्रकार घडल्याने अंनिसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अंधश्रद्धेचा वापर करून एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न अत्यंत निंदनीय आहे. समाजात भीती पसरवणाऱ्या या भोंदूबाबावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत तातडीने गुन्हा नोंदवून त्याला कडक शासन करावे, अशी आग्रही मागणी अंनिसने प्रशासनाकडे केली आहे







