पुणे : तब्बल ३० लाख रुपयांच्या जबरी चोरीची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या व्यापाऱ्याची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी ‘प्रॉपर्टी मिसिंग’ची नोंद केल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी ही कारवाई केली. या प्रकरणात निलंबित होणारे ते दुसरे पोलीस अधिकारी आहेत.

अक्षयकुमार नारायण गडगडे असे निलंबित पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० लाख रुपयांची जबरी चोरी झाली होती.
या घटनेप्रकरणी फिर्यादी श्रवण शंकरलालजी देवासी हे तक्रार देण्यासाठी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गेले होते. जबरी चोरीचा प्रकार निदर्शनास आलेला असतानाही संबंधित गुन्हा दाखल करून घेण्याऐवजी पोलीस उपनिरीक्षक गडगडे यांनी ‘प्रॉपर्टी मिसिंग’ची नोंद केली. या प्रकाराची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

या प्रकरणात यापूर्वी मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांनाही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले होते. आता पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे यांच्यावरही कारवाई झाल्याने या प्रकरणात निलंबित झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची संख्या दोन झाली आहे.








