महाबळेश्वर: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी तपासणी मोहीम राबवली आहे. या कारवाईत नियमांचे उल्लंघन आणि आवश्यक त्रुटी आढळल्याने 3 नामांकित हॉटेलचे अन्न विक्री परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत. तसेच आणखी 5 हॉटेलना नोटीस बजावून नियमांमधील त्रुटी दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुट्टीच्या काळात अचानक झालेल्या या कारवाईमुळे संबंधित हॉटेलमध्ये आधीच आरक्षण केलेल्या पर्यटकांसमोर अडचण निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल रामसुख, हॉटेल ब्राईटलँड आणि हॉटेल एव्हरशाईन या तीन हॉटेलवर प्रशासनाने कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींमुळे त्यांच्या अन्न विक्री परवान्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे काही पर्यटकांना राहण्यासाठी दुसऱ्या हॉटेलचा शोध घ्यावा लागत आहे.
विविध ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. हॉटेल व्यावसायिकांनाही अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

दरम्यान, प्रतिबंधित गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या विक्रीविरोधातही प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. अशा पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री करणाऱ्या संघटित टोळ्यांवर मकोका लावण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मुंढे यांनी दिली.

या अवैध व्यवसायात सहभागी असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.







