हडपसर : हडपसरमधील चिंतामणीनगर येथील भाजी मंडई परिसरात शनिवारी (ता. 14) मध्यरात्री दीडच्या सुमारास सुरक्षा रक्षकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या हल्ल्यात आकाश कोतवळे हे सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी परिसरातील दहा कार आणि एका बसची तोडफोड केली. या घटनेमुळे हडपसर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंतामणीनगर येथील भाजी मंडई परिसरात सुरक्षा रक्षक आकाश कोतवळे यांच्यावर आरोपींनी कोयत्याने वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी परिसरात उभ्या असलेल्या दहा कार आणि एका बसची तोडफोड करून दहशत निर्माण केली. हल्ल्याचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अन्जू ऊर्फ मोहम्मद हुसेन शब्बीर शेख आणि अविनाश सतीश केकाणे यांच्यासह तिघांना अटक केली असून, अन्य दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिजा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, हडपसर परिसरात वारंवार घडणाऱ्या कोयता हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुणे पोलीस आयुक्तांनी या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.








