Breaking News : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांच्या वेळी शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील, असं बोललं जात होतं. मात्र त्या वेळी हे एकत्र येणं प्रत्यक्षात घडलं नाही. (Breaking News)

आता मात्र महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची जोरदार माहिती समोर येत आहे. दोन्ही बाजूंनी याबाबतच्या चर्चा पूर्ण झाल्या असून, आता फक्त अधिकृत घोषणाच बाकी असल्याचं सांगितलं जात आहे.
यावर पुण्याचे माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी मोठं विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. विशेष म्हणजे, शरद पवार गटाचे उमेदवार हे घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दत्ता धनकवडे काय म्हणाले?
राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर बोलताना दत्ता धनकवडे म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणारच आहेत, यात कोणतीही शंका नाही. दोन्ही गटांमध्ये यावर चर्चा झाली असून, आता फक्त घोषणा बाकी आहे. ही अंतिम घोषणा लवकरच होईल आणि कार्यकर्त्यांना एक चांगली बातमी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसंच, आज माजी नगरसेविकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असून, प्रभाग क्रमांक ३८ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या प्रभागातील पाचही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असंही धनकवडे यांनी ठामपणे सांगितलं.
मुंबईतही हालचालींना वेग
दुसरीकडे, राज्यातील महापालिकांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करायची की नाही, यावर निर्णय घेण्यासाठी मुंबईत हालचाली सुरू आहेत. यासाठी जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि राजेश टोपे हे वरिष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी चर्चा करत असल्याची माहिती आहे.
इतकंच नाही तर, काही वेळापूर्वी अजित पवार यांनी देखील बैठकीदरम्यान राजेश टोपे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुण्यासह मुंबईत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.






