शिर्डी : शिर्डीतील साई मंदिरातील राजकीय विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय रद्द झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने नेमलेले हे विश्वस्त मंडळ बरखास्त केल्याने हा आघाडीसाठी मोठा धक्का आहे.
महाविकास आघाडी सरकारने साई संस्थानमध्ये विश्वस्त मंडळ स्थापन केले होते.विश्वस्तपदांसह अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा, उपाध्यक्ष शिवसेनेचा आणि विश्वस्त काँग्रेसचे असे वाटप झाले होते.
यासाठी १६ सदस्यांची केली नेमणूक केली होती. परंतु, घटनेनुसार या मंडळाची नेमणूक झाली नसल्याचा आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव शेळके यांनी यासंदर्भातील याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती.
गेल्या चार ते पाच महिन्यापासून औरंगाबाद खंडपीठात याबाबत सुनावणी सुरु होती. आज औरंगाबाद कोर्टाने शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर हे मंडळ बरखास्त झाल्यानंतर पुढील दोन महिन्यात नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेशही औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
दरम्यान, शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राज्यभरातून १६ सभासद निवडण्यात येतात. पुढील आठ आठवड्यात नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याचे कोर्टाने आदेश दिले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला नव्याने विश्वस्त मंडळ नेमावे लागणार आहे. नविन विश्वस्त मंडळाची नेमणूक होईपर्यंत जिल्हा न्यायाधीश साईमंदिराचा कारभार पाहणार आहे.