पुणे : पीएमपीच्या ताफ्यातील तब्बल १ हजार ३१८ बस जुलै महिन्यात ब्रेकडाऊन झाल्या आहेत. त्यानंतर पीएमपी प्रशासनाने ठेकेदाराकडून १६ लाख ६३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पीएमपीकडे प्रवास्यांच्या सेवेसाठी एकूण १९५८ बस आहेत. ११५६ बस या पीएमपीच्या मालकीच्या आहेत. तर ८०२ बस ठेकेदाराच्या मालकीच्या आहेत. त्यापैकी सुमारे १५०० ते १५५०बस दररोज विविध मार्गांवर धावत असतात. यातील ठेकेदाराच्या बसचे सर्वाधिक ब्रेकडाऊन होत असल्याचे पीएमपीएमएल प्रशासनाचे म्हणणे आहे.
एकीकडे आधीच पीएमपी तोट्यात आहे. प्रवासी संख्या घटत आहे. अशावेळी आहे ते प्रवासी टिकवणे हे पीएमपीसमोर आव्हान आहे. अशात ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले तर प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. सततच्या ब्रेकडाऊनमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही मोठा प्रश्न निर्माण होतो. पीएमपी तोट्यात असल्याने अलिकडेच जवळपास 25 मार्गांवरील सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पीएमपीला आपली सेवा सुधारणे क्रमप्राप्त आहे.
पीएमपी वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपी बसेसच्या ब्रेकडाऊनमुळे पीएमपी बसची प्रतिमा जनसामान्यांमध्ये मलिन होत आहे. यासंबंधी अनेक तक्रारीदेखील आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई तर होणारच आहे. त्यासोबत मेंटेनन्स सुधारण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.