पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबीयांबरोबरच गुन्हेगारी कृत्यामध्यें सामील असलेला आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या आठवड्याभरापासून निलेश चव्हाण हा फरार होता. अखेर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्याला शोधून काढलं आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या चुलत्यांसह इतरांना धमकावणाऱ्या आणि इतर आरोप असणारा निलेश चव्हाण आठवड्याभरापासून फरार होता. पिंपरी- चिंचवड पोलिसांची सहा पथकं निलेश चव्हाणचा शोध घेत होते. तो दुसऱ्या राज्यात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु, तो नेपाळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली आहे. लवकरच त्याला पिंपरी- चिंचवडमध्ये आणले जाणार आहे.

दरम्यान वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक खुलासे केले होते.यामध्ये हगवणे कुटुंबियांनी तयार केलेल्या कटात निलेश चव्हाण देखील सामील होता असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. अखेर या प्रकरणातील सहावा आरोपी निलेश चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे.







