पुणे : अहमदनगर मधील डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या हॉस्पिटलमधून ग्रीन कोरिडॉरद्वारे पुण्यातील चार रुग्णांसाठी अवयव पाठविण्यात आले आहे. यामुळे चार रुग्णांना जीवनदान मिळणार आहे.
संगमनेर येथील एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता. अपघातात त्याचा ब्रेन डेड झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने घोषित केले होते. त्यानंतर तरुणाच्या कुटुंबियांनी तरुणाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर विखे पाटील रुग्णालयाकडूनही पूर्ण तयारी केली होती. स्वत: खासदार सुजय विखे पाटील यांनी लक्ष देवून ग्रीन कॉरिडॉरसाठी प्रयत्न केले. ग्रीन कॉरिडोअरने चार अवयव अहमदनगरहून पुण्याला पाठविण्यात आले आहेत.
मृत तरुणाच्या दोन किडनी, एक लिव्हर आणि पॅनक्रिआज असे चार ऑर्गन काढून एक ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले आहे. ग्रीन कॉरिडोअरच्या मार्फत पुण्यातील जुपिटर, ओपोलो आणि सह्याद्री हॉस्पिटल या तीन हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये अवयव प्रत्यारोपण केल जाणार आहे. या अवयव दानामुळे पुण्यातील चार रुग्णांचे जीव वाचणार आहेत.
दरम्यान, अवयव दान करण्याबाबत अनेक नागरिकांच्या मनात वेगवेगळ्या धारणा आहेत. पण अवयव दानामुळे इतर रुग्णांना जीवनदान मिळतो. मृत्यूमुखी पावलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अवयव दान केल्याने इतर रुग्णांना प्रत्यारोपणातून जीवनदान मिळू शकतं. त्यामुळे अनेक रुग्णांलयामध्ये तसेच सामाजिक संस्थांकडून याबाबत जनजागृती केली जाते.
याबाबत बोलताना खासदार सुजय विखे पाटील म्हणाले कि, मृतक तरुणाच्या कुटुंबियांनी अवयव दान करून पुण्याचे काम केले आहे. त्यांचे मी खासदार या नात्याने मनापासून आभार मानतो. या अवयव दानामुळे पुण्यातील चार रुग्णांचे प्राण वाचणार असल्याने त्यांच्या कुटुंबियांना एका प्रकारचे समाधान मिळणार आहे.