मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून मैदानात उतरले आहेत. यामध्ये आघाडी घेतली आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी या पक्षाने. वंचित बहुजन आघाडीच्या गोटातून एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी आज आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 10 मुस्लिम उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत आम्ही नांदेड दक्षिणमधून मुस्लिम उमेदवार दिला आहे. आज परत दुसऱ्या यादीत आम्ही 10 मुस्लिम उमेदवारांची यादी जाहीर करत आहोत. सोबतच राज्याच्या राजकारणात आम्हाला मुस्लिमांना प्रतिनिधित्व द्यायचे असल्याची माहिती रेखा ठाकूर यांनी यावेळी दिली आहे.
काँग्रेसचे माजी आमदाराचा वंचितमध्ये प्रवेश..
दरम्यान, अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. खतीब हे प्रदेश काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार आणि पक्षाचे माजी उपाध्यक्ष राहिले आहेत. गेल्या साठ वर्षांपासून बाळापुर नगरपालिकेवर खतीब घराण्याची सत्ता राहिली आहे. तर 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे खतीब आणि त्यांच्या पत्नीचा अतिशय अत्यल्प मतांनी पराभव झाला होता. बाळापुर मतदारसंघ हा महाविकास आघाडीत नितीन देशमुख यांच्या वाट्याला जाणार असल्याची शक्यता आहे. अशातच त्या अनुषंगाने खतिबांनी वंचित बहुजन आघाडीची वाट धरली असल्याचेही बोलले जात आहे. खतीब यांच्या काँग्रेस सोडण्याने अकोल्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात होते.
वंचितच्या 10 मुस्लिम उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे…
- मलकापूर – शहजाद खान सलीम खान
- बाळापूर – खतीब सैयद नतीकुद्दीन
- परभणी – सैयद साहेबजान
- औरंगाबाद सेंन्ट्रल – जावेद कुरेशी
- गंगापूर – सैय्यद गुलाम नबी सय्यद
- कल्याण पश्चिम – अयाज मौलवी
- हडपसर – अॅड. मोहम्मद मुल्ला
- माण – इम्तियाज नदाफ
- शिरोळ – आरीफ पटेल
- सांगली – अल्लोद्दीन काझी