पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले असून, आगामी 3 महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, विमानतळ सुरू होण्यापूर्वीच त्याची वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी नुकत्याच याच एका घोषणेत सांगितले की, सर्व पायाभूत सुविधा पूर्ण झाल्यानंतर पुणे शहराच्या मध्यबिंदूवरून अवघ्या 20 मिनिटांत या विमानतळावर पोहोचणे शक्य होणार आहे.विमानतळ उभे राहण्यापूर्वीच अशा प्रकारे रस्ते आणि वाहतूक कनेक्टिव्हिटी विकसित करणारा हा देशातील पहिलाच अनोखा प्रकल्प ठरला आहे.

या विमानतळाचा प्रवास अतिशय सोयीचा व्हावा यासाठी दिवे घाटामध्ये दोन मोठे बोगदे तयार केले जाणार आहेत. यातील एक बोगदा रस्ते वाहतुकीसाठी असणार आहे, तर दुसऱ्या बोगद्यातून मेट्रो धावणार आहे. त्यामुळे पुणेकरांना विमानतळावर जाण्यासाठी मेट्रोचा पर्याय देखील उपलब्ध मिळणार असून, या दोन्ही बोगद्यांची लांबी सुमारे 4 ते 5 किलोमीटरच्या आसपास असणार आहे.

या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी पुरंदर विमानतळासह पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, पर्यटन वाढ आणि उत्कृष्ट रस्ते निर्मितीवर सविस्तर चर्चा केली. तसेच चाकण आणि हिंजवडी या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांमधील विविध समस्या व त्यांच्या उपायांवरही प्रकाश टाकला. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे पुणे आणि आसपासच्या परिसरातील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार असून, विकासाला नवी दिशा मिळणार आहे.







