पुणे : महाराष्ट्रात गाजत असलेल्या कोट्यवधींच्या ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात नाशिकच्या विशेष तपास पथकाने मोठी कारवाई करत मुख्य आरोपी संजय गरुड याला सोलापूरमधील एका फार्महाऊसमधून ताब्यात घेतले आहे. गरुड हा भाजपचा स्थानिक नेता असून जळगाव जिल्ह्यातील जामनेर (शेंदूर्णी) येथील 15 शैक्षणिक संस्थांचा प्रमुख आहे. या प्रकरणी झालेली ही 6 वी प्रमुख अटक आहे.

या कारवाईची पार्श्वभूमी जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांच्या चौकशीतून समोर आली. हिंगोणीकर याने आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून 259 शिक्षक व कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर वैयक्तिक मंजुरी दिली होती. त्यातील बहुतांश कर्मचारी हे गरुड याच्या संस्थांमधीलच असल्याचे स्पष्ट झाले. हिंगोणीकरने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा रचून ही धडक कारवाई केली.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यांमधील तब्बल 841 कर्मचाऱ्यांच्या नावांचा गैरवापर या गैरव्यवहारात करण्यात आला आहे. गरुडच्या मालकीच्या संस्थांमधील 177 कर्मचाऱ्यांना बनावट मान्यता देऊन, सुमारे 160 कोटी रुपयांचा सरकारी निधी लाटल्याचा गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे.
आतापर्यंत उघडकीस आलेल्या 481 संशयित कर्मचाऱ्यांपैकी 438 जण हे एकट्या जळगाव जिल्ह्यातीलच आहेत. जानेवारी 2024 मध्ये शरद पवार यांच्या पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या या बड्या संस्थाचालकाच्या अटकेमुळे शिक्षण विभागासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे
. एसआयटीच्या या धडक कारवाईमुळे आता या संपूर्ण प्रकरणातील आणखी अनेक गूढ गुपिते बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






